ताज्या घडामोडी

इलेक्ट्रो थेरपी व नियमित व्यायाम देईल खेळाडूंना तंदुरुस्ती – डॉ. अमित राव्हटे

Spread the love

क्रीडा प्रतिनिधी – बाळ तोरसकर

मुंबई : १६ जाने. (क्री. प्र.), “इलेक्ट्रो थेरपी बरोबरच तज्ज्ञांच्या सल्ल्याने नियमित व्यायाम (एक्सरसाईज) प्रत्येक खेळाडूने केला तर दुखापतीमधून तो लवकर बरा होऊ शकेल,” अशी अपेक्षा महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या वतीने प्रसिद्ध फिजिओथेरपिस्ट डॉक्टर अमित राव्हटे यांनी केली.

देशाचे पहिले ऑलिंपिक पदक विजेते स्वर्गीय खाशाबा जाधव यांच्या जयंती निमित्त आणि महाराष्ट्र क्रीडा दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र खो-खो असोसिएशनने आयोजित केलेल्या ऑनलाइन वेबिनार मार्गदर्शन प्रसंगी ते बोलत होते. ‘दुखापतीनंतर केले जाणारे आधुनिक उपचार पद्धती’ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी भारतीय खो-खो महासंघाचे सहसचिव प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव, राज्याचे कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, सचिव अ‍ॅड. गोविंद शर्मा, खजिनदार अ‍ॅड. अरुण देशमुख, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सर्व सहसचिव यांच्यासह खेळाडू, मार्गदर्शक, क्रीडाप्रेमी आणि वृत्तपत्र प्रतिनिधी सहभागी झाले होते. याप्रसंगी प्रस्तावनेत सचिव अ‍ॅड. शर्मा यांनी वेबिनारचा उद्देश आणि आवश्यकता याची माहिती दिली. तसेच खेळाडूंना सशक्त ठेवण्यासाठी असोसिएशन सातत्याने असे उपक्रम राबवत राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

खो-खो खेळाडू आणि प्रशिक्षकांना मार्गदर्शन करताना डॉ. राव्हटे म्हणाले की, खो-खो खेळ अत्यंत वेगवान आहे. त्यामुळे खेळाडूला अनेकवेळा दुखापती होतात. मॅटवर हे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे खेळाडू सशक्त राहण्यासाठी आणि दुखापतीनंतर बरे होऊन पुन्हा मैदानावर येण्यासाठी मेहनत घेतली पाहीजे. यासाठी फिजीओथेरपीचा उपयोग खूप महत्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्येही नवनवीन तंत्र आली असून त्याचा तज्ज्ञांच्या सल्ल्याने अवलंब केला तर खेळाडून नव्या दमाने खेळू शकतो. नुकत्याच जबलपूर येथे झालेल्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्र खो-खो संघातील काही खेळाडूंना दुखापती झाल्या. त्यांना बरे करण्यासाठी इलेक्ट्रो थेरीपी बरोबरच ड्रायनेडली आणि कायनॅसो टेपिंग या उपचार पध्दतीचा अवलंब केला. त्याचा फायदाही झाला असून खेळाडू अल्पावधीत मैदानात खेळू शकले. मॅटवर खेळताना खांद्यांसह लिगामेंटच्या दुखापती होताना दिसतात. त्यावर मात करण्यासाठी नियमित व्यायाम केला पाहीजे. तसेच खेळाडूंनी जास्तीत जास्त पाणी पिणे आवश्यक आहे असेही त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!