ताज्या घडामोडी

अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाकडून *डॉ. सुनील दादा पाटील यांना दोन पुरस्कार

Spread the love

अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे दरवर्षी प्रकाशकांसाठी उत्कृष्ट ग्रंथ निर्मितीसाठी पुरस्कार विविध विभागात दिले जातात. केवळ प्रकाशकांसाठी असलेल्या आणि महाराष्ट्रातील एकमेव अशा उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कारांची घोषणा अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ, पुणे यांच्या तर्फे नुकतीच करण्यात आली आहे. हे सर्व पुरस्कार प्रकाशकांसाठी असून मुखपृष्ठांचे पुरस्कार प्रकाशक व चित्रकार असे दोघांनाही दिले जातात. जयसिंगपूर येथील नामांकित लेखक – संपादक आणि अनेक अभिरूचीसंपन्न पुस्तकांचे प्रकाशक डॉ. सुनील दादा पाटील यांना अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाकडून उत्कृष्ट ग्रंथ निर्मितीसाठी नुकतेच दोन पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. या पूर्वी अनेक राष्ट्रीय प्रतिष्ठित सन्मान आणि पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. सांस्कृतिक – साहित्यिक चळवळीतून डॉ. सुनील दादा पाटील यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. वाचनसंस्कृतीच्या बळकटीसाठी त्यांच्याकडून विविध पातळीवर प्रमाणिक प्रयत्न केले जात आहेत. वाचनसंस्कृती संवर्धनासाठी विविध अभिनव उपक्रमही त्यांच्याकडून सातत्याने चालवले जात आहेत त्यापैकीच एक म्हणजे ते चालवत असलेली कवितासागर पोस्टल लायब्ररी ही खूपच अनोखी आणि अत्यंत आगळी – वेगळी साहित्यसेवा आहे.
अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ, पुणे ही संस्था लेखक आणि प्रकाशकांची अखिल भारतीय स्तरावरील शिखर संस्था आहे. मराठी प्रकाशन क्षेत्रात सुपरिचित असलेल्या काही व्यावसायिकांनी १९९६ च्या विजयादशमीच्या दिवशी ‘अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघा’ची स्थापना पुणे येथे केली व संस्थेची, सोसायटीज रजिस्ट्रेशन अॅक्ट व ट्रस्ट अॅक्ट या कायद्यानुसार रीतसर नोंदणी केली. आज मराठीतील बहुतेक सर्व मान्यवर प्रकाशन संस्था अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे सभासद आहेत.
अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ, पुणे ही मराठी प्रकाशकांची प्रातिनिधिक संस्था झालेली आहे. महाराष्ट्रातील अनेक ग्रंथ विक्री योजनात आणि राष्ट्रीय पातळीवर फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स तर्फे आयोजित अनेक प्रदर्शने व ग्रंथविषयक कार्यक्रमात संघाने मराठी प्रकाशकांचे प्रतिनिधित्व केले आहे. फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स या भारतीय प्रकाशकांच्या मध्यवर्ती संस्थेशी अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ संलग्न आहे.
अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाकडून उत्कृष्ट ग्रंथ निर्मितीसाठी विविध विषयानुसार पुरस्कार दिले जातात. कवितासागर पब्लिशिंग हाउस, जयसिंगपूर यांनी प्रकाशित केलेल्या ‘कवितासागर प्रकाशन डायरी – ग्रंथसूची २०२२’ या ग्रंथसूचीसाठी ‘जाहिरात व प्रचार साहित्य’ या विभागातील उत्कृष्ट ग्रंथ निर्मितीसाठी अतिशय प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘प्रथम पुरस्कार’ देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे सलग तिसर्‍या वर्षी अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाकडून ‘जाहिरात व प्रचार साहित्य’ या विभागातील उत्कृष्ट ग्रंथ निर्मितीसाठी प्रथम पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे; त्यापेक्षा तो संपादक आणि प्रकाशक डॉ. सुनील दादा पाटील यांच्या मेहनतीला मिळतोय याचा आनंद लेखकांना आणि वाचकांना जास्त झाला आहे.
तर दुसर्‍या पुरस्कारासाठी नागपूर जिल्ह्यातील ज्येष्ठ लेखक डॉ. संजय सुकृतदास बर्वे यांच्या ‘कबीर बीजक: एक दार्शनिक ग्रंथ’ या पुस्तकास ‘ग्रामीण / निमशहरी’ या विभागातील उत्कृष्ट ग्रंथ निर्मितीसाठी उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात येणार आहे. सदर दोन्ही पुस्तकांची प्रथम आवृत्ती संपली असून लवकरच नवीन स्वरुपात दुसर्‍या आवृत्तीचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती प्रकाशक डॉ. सुनील दादा पाटील यांनी दिली. हे दोन्ही ग्रंथ कवितासागर पब्लिशिंग हाउस, जयसिंगपूर यांनी सिद्ध केले असून मुद्रण कवितासागर प्रिंटिंग सर्व्हिसेस, जयसिंगपूर यांनी केले आहे.
डॉ. सुनील दादा पाटील यांचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक संशोधनात्मक ग्रंथ प्रकाशित झाले. यातील काही ग्रंथांच्या विशेष निर्मितीसाठी विविध विक्रमांची नोंद त्यांच्या नावावर झालेली आहे.
या पुरस्काराचे वितरण नाशिक येथे संपन्न होणार्‍या अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे लेखक – प्रकाशक साहित्य संमेलनात रविवार दिनांक ०७ मे २०२३ रोजी सकाळी १० वाजता कुसुमाग्रज स्मारकात करण्यात येणार आहे. लोकप्रिय सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम, अशोक कोठावळे, रामदास भटकळ व प्रवीण दवणे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केले जाणार असून सदर पुरस्कार कवितासागर परिवाराचे ज्येष्ठ सदस्य ऐनाथ पेन्शनवार आणि प्रसिद्ध लेखिका कविता केशवराव शिंदे हे स्वीकारतील. या संमेलनात प्रदान केले जाणारे पुरस्कार हे संमेलनातील कोणत्या दिवशी व कोणत्या सत्रात सदर पुरस्कार प्रदान सोहळा पार पडेल ते लवकरच जाहीर करत आहोत. अशी माहिती अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ, पुणे यांच्या केंद्रीय कार्यकारिणीने पत्रकाद्वारे दिली आहे.
डॉ. सुनील दादा पाटील यांच्या साहित्य विषयक आणि ग्रंथालयीन सेवेच्या विशेष योगदानासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी यापूर्वी सन्मानित करण्यात आले असून प्रधानमंत्री कार्यालय, नवी दिल्ली यांनी त्यांना वेळोवेळी अनेक लेखी पत्र पाठवून त्यांच्या पुस्तकांचे कौतुक केले आहे. पुस्तकांची निर्मिती हा प्रकाशन व्यवसायाचा आत्मा आहे आणि सातत्याने विकसित होणार्‍या तंत्रज्ञानाचा अंगीकार केल्या शिवाय आपल्याला ‘पुस्तक निर्मिती’ मध्ये ‘उत्कृष्ट निर्मिती’ चे शिखर गाठणे अशक्यच आहे. मराठी पुस्तकांच्या प्रचारा – प्रसारासाठी जाणवणारी उणीव दूर झाली पाहिजे. तसेच वितरक – विक्रेते आणि प्रकाशक यांच्यातील संवाददेखील वाढला पाहिजे. असे मत प्रकाशक डॉ. सुनील दादा पाटील यांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ, पुणे यांच्याकडून यावर्षी मिळणार्‍या दोन उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कारासाठी त्यांचे अनेकांनी अभिनंदन केले असून कवितासागर प्रकाशनाची महाराष्ट्रभर होणारी चर्चा आणि त्याला मिळत असलेला सकारात्मक प्रतिसाद, मिळत असलेले विविध पुरस्कार यामुळे त्यांचे कौतुक त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!